सातारा प्रतिनिधी । सातारा शहराची शान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना पावसाळयात किल्ल्यावरून कोसळणाऱ्या दरडीतुन नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, या वसाहतीना आता संरक्षक भिंतीचे कवच मिळणार आहे. कारण सातारा पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
सातारा शहरालगत असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्याच्या डोंगरउतावर अलिकडच्या आठ – दहा वर्षांत प्रचंड लोकवस्ती वाढली. केसरकर पेठ, माची पेठ तसेच बोगदा परिसरात हजारो घरे व टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की अजिंक्यतारा किल्ला पायथ्याशी असलेल्या घरांना दरड कोसळण्याचा धोका संभवतो. आतापर्यंत अनेकदा किल्ल्यावरुन महाकाय दगड वसाहतींच्या दिशेने आले असून, घरांचे नुकसान झाले आहे.
अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आठ वर्षांपूर्वी केसरकर पेठ ते बोगदा या दरम्यान संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे २० कोटींचा प्रस्ताव तयारही करण्यात आला. मात्र, ठोस काही झाले नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा डोंगरी भागाचा सर्व्हे करून संरक्षक भिंतीचा ३५ कोटींचा आरखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
कोसळणाऱ्या दरडीच्या बचावासाठी अशी होणार कामे…
1) ज्या ठिकाणी दगड अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणीच संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
2) किल्ल्यावरुन येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी भिंतीला लागूनच नाला बांधला जाणार आहे.
3) किल्ल्यावरुन येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांना हे नाले जोडले जाणार आहेत.
4) दोन किलोमीटर लांबीचा ही भींत असून, या भिंतीमुळे नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होणार आहे.