सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेने शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई सुरु ठेवली.पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले.
सातारा पालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने अडथळे ठरणारे होर्डिंग, रस्त्यात लक्ष वेधणारे जाहिरात फलक यांना लक्ष्य केले आहे. वाहतूक विभागाने दोनच दिवसापूर्वी खण आळी आणि व्यापारी पेठेमध्ये वाहतुकीला अडथळा होणाऱ्या लोखंडी जाळ्या आणि तेथील छोट्या मोठ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले होते.पालिकेने शनिवारी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून थेट कारवाईला सुरुवात केली.
पालिका अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि पाच कर्मचाऱ्यांनी एक डंपर घेऊन पोवई नाका, सेंट पॉल हायस्कूल, जिल्हा रुग्णालय परिसर, मुथा चौक, कूपर बंगला, जिल्हा रुग्णालय पिछाडी ते अजिंक्य हॉस्पिटल चौकापर्यंत वाहतुकीला अडथळे ठरणारे आणि परिसराचे विद्रूपीकरण करणारे २२ फलक हटवले.