सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका संचालनालयाच्या अधिकारी पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी या कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. तसेच सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभिंयता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे व अधिकारी उपस्थित होते.
कास तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. नैसर्गिक अधिवासातील तलावतील पाणी अत्यंत शुद्ध असून, सातारकरांची तृष्णा या पाण्याने भागवली जाते. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून, तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या उपाययोजना पालिकेच्यावतीने राबवण्यात येत आहे. त्यासाठीच तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
या कामाची आणि वाढीव जलसाठ्याचा उपयोग करुन घेण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाच्या तांत्रिक बाबी सिंचन विभाग पहात आहे. प्रशासकीय आणि निधीची हाताळणी नगरपालिका संचालनालय करत आहे. यामुळे या पाहणीस महत्त्व असून आगामी काळातील इतर कामे व त्यासाठी आराखडा तयार करण्यास गती मिळणार आहे.