सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्यातील हे इगो वॉर असून, त्यात सातारकर आणि शिवप्रेमी अडकले आहेत, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्या टिकेला आज खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमचे सलोख्याचे संबंध आहेत. माझा कोणत्याही कामाला विरोध नाही; परंतु पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य हे जपलेच पाहिजे. मात्र, आमच्या दोघांच्यात गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, ज्यांची बौद्धिक उंची नाही, बौद्धिक पातळी नाही अशा व्यक्तींनी आमच्यात गैरसमज निर्माण करू नये. शिवतीर्थ आयलँडबाबत पालकमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली पाहिजे, ते अजून माझ्याकडे आलेच नाहीत, जे काय आहे ते कायद्याने होईल आणि इगो हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही असे खा. उदयनराजे यांनी म्हंटले.
खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जलमंदिर या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे कार्य खूप मोठे आहे. आज यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचे स्मारक आहे. मग बाळासाहेब देसाई यांचे स्मारक का असू नये? या स्मारकाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. तरी देखील काही मंडळी माझा विरोध असल्याचे भासवत आहेत.
पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे, ही जशी माझी भूमिका आहे तशीच ती पालकमंत्र्यांची देखील आहे. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे इथली जमीन आतून पोकळ झालेली आहे. येथे कोणत्याही प्रकारचे काम करताना सर्व तांत्रिक बाबी विचारात घ्यायला हव्यात. शिवतीर्थ परिसर ऐतिहासिक असून तो तसाच राहावा, अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे. त्यामुळे हा परिसर अधिक सुशोभीत कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
माझा काही संबंध नसताना उदयनराजे स्वतःच्या विश्वात असतात असं बोललं गेलं. हो मी लोकांच्या विश्वास असतो. कारण नसताना शिवतीर्थाबद्दल चर्चा चालू आहे. उदयनराजेंच पेंटिंग काढाव असं लोकांना वाटलं. मी स्वतःचे उदो उदो करून घेणारा नाही. आमच्या इमारतीवर तरुणांनी वर्गणी काढून पेंटिंग काढलं, असा टोला उदयनराजेंनी यावेळी शिवेंद्रराजेना लगावला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत उदयनराजे म्हणाले…
खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, कलेक्टर हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. त्यांची तडकाफडकी बदली होत असेल तर बाकीच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर परिणाम होणार आहे. कलेक्टर यांची बदली संशयास्पद आहे,गरोदर व्हायच्या अगोदर बदली केली, असल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले.