सातारा प्रतिनिधी । रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच काढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशनजवळील काळीमोरी रेल्वे पूल पाडून रेल्वे विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारला. परंतु, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वाठार पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना पंधरा दिवसासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वाहतुकीचा तसेच लोकांच्या मागणीचा विचार करून पोलीस प्रमुख अधीक्षकांनी सोमवार दि. ७ ते दि. १६ ऑक्टोंबरपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा /शिरवळमार्गे पुणे बंगळुरु महामार्गाने सातारकडे जातील, सातारकडून येणारी अवजड वाहतूक पुणे बंगळूर महामार्गाने खंडाळा शिरवळवरून लोणंदकडे जाईल, तसेच फलटण व लोणंद वरून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने आदर्की फाटा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुकवरून वाठार स्टेशनमार्गे सातारकडे जातील.
तसेच सातारा कोरेगाव येथून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारचे हलकी व दुचाकी वाहने अंबवडे चौक, वाग्देव चौक येथून पिंपोडे बुद्रुकवरून तडवळे संमत वाघोलीवरून लोणंद व फलटणकडे जातील. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाठार पोलिसांनी केले आहे