कराड प्रतिनिधी | वाठार स्टेशन -सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीतील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल नवीन रेल्वेलाइनकरिता पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील सात दिवस बंद राहणार असल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशनजवळील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल, दुहेरी रेल्वेलाइन करण्यासाठी पाडण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वेच्या टनेल विभागाच्या महाव्यवस्थापकांनी वाठार पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून, या मार्गावरील वाहतूक 15 दिवसांसाठी बंद करण्याची सूचना केली होती. मात्र, या मार्गावरील वाहतूक आणि लोकांच्या मागणीचा विचार करून, शुक्रवार, दि. 6 ते शुक्रवार, दि. 13 पर्यंत या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढली आहे.
वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा-शिरवळमार्गे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याकडे जातील. साताऱ्याकडून येणारी अवजड वाहतूक पुणे-बंगळुरू महामार्गावरून खंडाळा-शिरवळमार्गे लोणंदकडे जातील. फलटण व लोणंदवरून येणारी सर्व प्रकारची (दुचाकीसह) आदर्की फाटा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुकवरून वाठार स्टेशनमार्गे साताऱ्याकडे जातील. सातारा, कोरेगावकडून लोणंद व फलटणकडे जाणारी सर्व हलकी व दुचाकी वाहने आंबवडे चौकमार्गे पिंपोडे बुद्रुक, तडवळे संमत वाघोलीवरून जातील. या पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करावा, असे आवाहन समीर शेख यांनी केले आहे.