कराड प्रतिनिधी । देशात झालेल्या दबावतंत्रााच्या राजकारणात देखील काँग्रेसने आपले लोकशाही विचार सोडले नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ राहिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळी उर्जा दिसत आहे. याच बळावर राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष एक नंबरवर राहील, असा विश्वास काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला.
कराडात काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आ. भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव उपस्थित होत्या.
यावेळी आ. भाई जगताप म्हणाले की, गेल्या एक-दीड वर्षात राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीबाबत लोकांमध्ये चीड आहे. देशात विरोधकांचे दबावतंत्राचे राजकारण सुरू आहे. या सर्वांचा परिणाम कर्नाटक निवडणुकीत दिसून आला आहे. त्या पध्दतीने महाराष्ट्रातही परिणाम दिसतील. राज्यात महाविकास आघाडी अबाधित आहे. येत्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दबावतंत्राच्या राजकारणातही काँग्रेस पक्ष तत्वांशी एकनिष्ठ राहिला : आमदार भाई जगताप pic.twitter.com/kRsSbf7cbV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 12, 2023
काँग्रेस नेतृत्वाचे कृतीतून सडेतोड उत्तर
गेल्या दहा वर्षात विरोधकांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रचंड टीका केली. त्याला सोनिया गांधी, राहुल गांधींनी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर दिले आहे. कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असून भाजपकडेही चारच राज्यांची सत्ता आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजपला धोबीपछाड दिली. मोदींनी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. प्रकल्पांच्या घोषणा केल्या. परंतु, मोदी घोषणा करतात, ते प्रकल्प कधीच पूर्ण होत नाहीत, अशी टीकाही भाई जगताप यांनी केली. तसेच आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची मते आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. त्याचा अहवाल 15 ऑगस्टपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सदर करणार असल्याची माहिती आमदार भाई जगताप यांनी दिली.
काँग्रेसकडे धुलाई मशीन नाही
राज्यात दीड वर्षाच्या कालावधीत दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली.दबाव तंत्राला बळी पडून अनेकांनी पक्षांतर केले असून भ्रष्ट लोकांची संख्या त्यात जास्त आहे. परंतु, भाजपप्रमाणे कोणालाही प्रवेश द्यायला काँग्रेसकडे धुलाई मशीन नाही, असा टोला आमदार भाई जगताप यांनी भाजपला लगावला. तसेच तीन सप्टेंबरपासून राहुल गांधींच्या भारत जोडोचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ल्यांचा देखील त्यांनी निषेध केला. कोणत्याही विचारांचे अधिष्ठान नसलेला लोकांकडून अशी कृत्ये होत आहेत. अशा घटना निंदनीय आहेत, असे भाई जगताप म्हणाले.