सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) ची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारनंतर देशात आचार संहिता लागू झाली. या दरम्यान, माढा लोकसभा मतदासंघांपैकी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी 5 फिरती पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती नियंत्रण कक्षात काल प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी फलटणचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी ढोले म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसरा टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान आहे तर मतमोजणी ही 4 जुन रोजी संपन्न होणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी 5 फिरती पथके तैनात करण्यात आली आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 4 लाख 67 हजार 051 लोकसंख्या आहे. तर 3 लाख 34 हजार 855 एवढे मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 1 लाख 71 हजार 454, महिला मतदार या 1 लाख 63 हजार 387 तर तृतीयपंथी मतदार 14 असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.