सातारा प्रतिनिधी । भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना देवकर यांना त्यांच्या बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सातारा शहरा नजीकच्या पुणे-बेंगलोर महामार्गावर एकजण इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा माल बाळगून विक्रीसाठी थांबलेला आहे. या माहितीच्या अनुषंगाने पाहणी करून तत्काळ कारवाई करण्याबाबत देवकर यांनी पथकास सूचना दिल्या. या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयिताचा शोध घेतला असता त्या ठिकाणी दोन पोती घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या एकाचा संशय आल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता तो पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याच्याजवळ असलेल्या दोन पोत्यांमधील बॉक्सची तपासणी केली असता भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटीच्या ई सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १० लाख ४१ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, पोलीस हवालदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धीरज महाडिक, वैभव सावंत यांनी ही कारवाई केली. या पश्चिम महाराष्ट्रातील ई-सिगारेटवरील पहिल्या कारवाईबाबत सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस यांनी अभिनंदन केले आहे.
काेम्बिंग ऑपरेशनच्या कारवाया
पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहिता व दिवाळीच्या अनुषंगाने काेम्बिंग ऑपरेशन करून कारवाया करण्याबाबतच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार देवकर यांनी काेम्बिंग ऑपरेशनसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले.