सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पाच चोरट्यांकडून जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे 26 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली रोकड आणि दागिने, असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 2 लाख 40 हजार रूपयांची रोडक आणि 56 तोळ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी एलसीबी पथकाचे कौतुक केले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मार्च रोजी भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील 9,29,500 रुपये किंमतीचे 29 तोळे 6 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांच्यासह वेगवेगवेळी तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश दिला होता.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना रेकॉर्डवरील सराईत चोरटा सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (रा. रामनगर, कटकेवाडी, ता. हवेली, जि.पुणे) याने घरफोडी केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीस ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने संशयिताला साताऱ्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्याने तपास करुन 12 घरफोडीचे व 2 चोरीचे, असे एकुण 14 गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले 13 लाख 19 हजार 900 रूपये किंमतीचे 19.7 तोळे सोने, तसेच गुन्ह्यात वापरलेली बोल्ट कटर व स्क्रू ड्रायव्हर, अशी हत्यारे हस्तगत केली.
एलसीबीच्या तपास पथकाने पोलीस रेकॉडर्वरील रोहन बिरु सोनटक्के (रा. मुरुम उमरगा, जि. अहमदनगर), महेंद्र रामाभाई राठोड (रा. कुसेगांव दौंड, जि. पुणे), संदिप झुंबर भोसले (रा. वाघोली, जि. पुणे) आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 घरफोडीचे आणि 6 चोरीचे, असे एकुण 12 गुन्हे उघडकीस आणले. चोरीस गेलेल्या मुद्देमालातील 24 लाख 45 हजार 500 रुपये किंमतीचे 36.5 तोळ्याचे दागिने आणि 2 लाख 40 हजार रूपयांची रोकड हस्तगत केली. नोव्हेंबर 2022 पासून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे एकुण 189 गुन्हे उघड करुन 3 कोटी 10 लाख 86 हजार रूपये किंमतीचे तब्बल 4 किलो 982 ग्रॅमचे दागिने हस्तगत केले आहेत.