सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात होणाऱ्या घरफोडी, चोरीच्या घटनांमधील आरोपींना जेरबंद करण्याची मोहीम सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतली आहे. या अनुषंगाने संबंधित विभागाने धडक कारवाई करत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेले दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांतील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ४६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यातही या विभागाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील दरोडा व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले होते.
त्यानुसार संबंधित पथकाने लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये रोहित ऊर्फ टक्या चिवळ्या पवार (रा. सुरवडी, ता. फलटण) याचा सहभाग असल्याचे तपासात उघड केले. त्यानुसार उपनिरीक्षक अमित पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी संशयिताकडे कसून चौकशी केली.
त्यामध्ये त्याने साथीदारांसोबत खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण व पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस पथकाने पुढील तपासात दरोड्याचा एक, जबरी चोरीचे पाच, घरफोडीचे १२ व अन्य चोऱ्यांचे पाच असे एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले ३२ लाख दहा हजार रुपये किमतीचे ५३ तोळे सोन्याचे व ४६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवकर, सहायक निरीक्षक भोरे, उपनिरीक्षक अमित व पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, सहायक फौजदार विश्वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, हवालदार शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधणे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, सनी आवटे, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, स्वप्नील कुंभार, अमित झेंडे, अजय जाधव, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, संकेत निकम, प्रवीण पवार, अधिका वीर, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, विजय निकम हे या कारवाईत सहभागी होते.