सातारा एलसीबीची मोठी कारवाई; निवडणुकीच्या काळात घातक स्फोटकांचा बेकायदा साठा केला जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. तीन दिवसांवर मतदान आहे. अशातच साताऱ्यात एलसीबीने मोठी कारवाई करत जिलेटीन आणि डिटोनेटर्स, अशा घातक स्फोटकांचा बेकायदा साठा जप्त केला आहे. स्फोटकांची वाहतूक करणारी स्कार्पिओ कार, १०७० जिलेटीनच्या कांड्या, ७६ डिटोनेटर्स, असा एकूण ६ लाख १७ हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालाचा जप्त करून श्रीधर संभाजी निंबाळकर (सध्या रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. वाहगाव, ता. वाई) यास अटक केली आहे.

आचारसंहिता काळात बेकायदेशीर स्फोटक पदार्थाबाबत माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. त्यानुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी खास पथक तयार केले होते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राच्या रस्त्याने स्कॉर्पिओ वाहनातून बेकायदेशीर जिलेटीन स्फोटके नेली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले.

बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच आझाद व सुर्या या श्वानांसह एलसीबीच्या पथकाने आनंद कृषी पर्यटन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. बुधवारी (दि. १ मे) सायंकाळी त्या रस्त्त्याने आलेल्या स्कार्पिओची तपासणी केली असता गाडीमध्ये ५ खाकी बॉक्स आणि पोती आढळून आली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत तपासणी केली असता जिलेटीन आणि डिटोनेटर्स, अशी घातक स्फोटके असल्याची खात्री झाली. ती स्फोटके विक्रीसाठी घेउन निघाल्याचे कार चालकाने सांगितले. पोलिसांनी स्फोटक पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी, असा ६ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयितास अटक केली.

पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र तेलतुंबडे, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, हवालदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, केतन शिंदे, सचिन ससाणे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक शशिकांत घाडगे, अंमलदार महेश पवार, नीलेश दयाळ, अतुल जाधव, विजय सावंत, अनिकेत अहिवळे, स्मीता पाटील, प्रशांत चव्हाण, केतन जाधव यांनी ही कारवाई केली.