सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत चोरट्याकडून दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 16 गुन्हे उघड केले असून 40 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक सातारा बापू बांगर यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले आहे.
दि.३१/०८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे याचा कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.३०३/२०२३ भादविक ३९७, ३९५, ३९४, ४५७, ३८० या गुन्हयामध्ये सहभाग असून तो फलटण शहरात वावरत आहे. तसेच नमुद आरोपी हा अत्यंत हुशार असून तो गुन्हयाचे तपासकामी मिळून येत नव्हता.
त्याच्या गुन्हे पध्दतीचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील, विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने नाना पाटील चौक फलटण परिसरात सापळा लावून आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे (वय 21, रा. विसापूर ता.खटाव जि. सातारा) यास त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याचेकडे कोरेगाव पोलीस ठाणे गु. र. नं.३०३/२०२३ भादविक ३९४, ४५७, ३८० या गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथिदार ऋतुराज भावज्या शिंदे रा.खातगुन ता. खटाव जि. सातारा, कोहिनूर जाकिर काळे रा. मोळ ता. खटाव जि. सातारा, चंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे रा. विसापूर
ता. खटाव जि. सातारा, अभय काळे रा.मोळ ता. खटाव जि. सातारा, अतिक्रमण काळे रा.खातगून ता. खटाव जि. सातारा, केला असल्याचे सांगितल्याने महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे नमुद गुन्हयात अटक केली.
तसेच त्यांची 6 दिवस पोलीस कोठडी घेतली व ऋतुराज भाज्या शिंदे यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याची 5 दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली होती. तसेच नमुद गुन्हा 7 आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने गुन्हयास भा.द.वि.क.३९५, ३९७ ही वाढीव कलमे लावण्यात आलेली आहेत. पोलीस कोठडी मुदतीत अटक आरोपींच्याकडून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 77 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे, गुन्हयात वापरलेले मोटार सायकल हस्तगत केला तसेच आणखी 15 गुन्हयातील एकूण 66 तोळे सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे असा एकूण (चालू बाजार भावाप्रमाणे) 40 लाख 10 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून नमुद आरोपींच्याकडून दरोडा, 1 जबरी चोरी, 14 घरफोडीचे गुन्हे असे एकूण 16 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात 67 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण 67 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी 235 तोळे सोने (सव्वा दोन किलो) असा एकूण 1 कोटी 82 लाख 96 हजार 830 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.