साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील सांडवली (वारसवाडी) येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांचे गुरुवारी श्रीनगर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव शनिवारी मुंबईत आणण्यात आले. तसेच त्यांच्या पार्थिवावर टागोरनगर (विक्रोळी, मुंबई) येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांचे गुरुवारी श्रीनगर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव श्रीनगरहून शनिवारी रात्री दोन वाजता चैतन्यनगर (आयआयटी, पवई) येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. यानंतर आज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्यदर्शनानंतर विक्रोळीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

पार्थिव विक्रोळीत आणल्यानंतर त्या ठिकाणी वडील रामचंद्र कोकरे, आई सविता, बहीण अनिता यांनी साश्रुनयनांनी विजयचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सैन्यदल व पोलीस विभागामार्फत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सैन्य दलाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर विजय कोकरे यांचे चुलत भाऊ राकेश कोकरे यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जवान विजय कोकरे यांच्या पश्चात आई, बहीण आणि वडील स परिवार आहे.