सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांच्या वीरमरणाने परळी परिसर शोकसागरात बुडाला आहे.
परळीतील जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. 2017 मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण केले. त्यांचे आई-वडीलही मुंबईतच राहतात. त्यांचे वडील मुंबईत खासगी वाहनचालक आहेत. जवान विजय कोकरे यांच्या मागे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर सांडवली परिसरात त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक ग्रामस्थांकडून लावण्यात आले आहेत. विजय कोकरे हे भारतीय सैन्य दलात गेली ४ वर्षे कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले.त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाइकांना आर्मी सेंटरकडून देण्यात आली आहे.