सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. दीड हजार रुपये मानधनवाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने २८ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २४ हजार रुपये मानधन देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने (आयटक) जिल्हाधिकारी तसेच प्राथिमक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड. नदीम पठाण, आयटक काैन्सिल सदस्या कविता उमाप, सचिव विठ्ठल सुळे, संघटक संदीप माने, संजय पाटील, काॅ. शिवाजीराव पवार, खंडाळा तालुकाध्यक्षा शैला जाधव तसेच इतर सदस्य यांनी उपस्थिती लावली होती.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन गांभिर्याने पाहत नाही. फक्त तोंडी आश्वासने दिली जातात. डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेले. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या अनुषंगाने काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच इतर मागण्यांसाठीही आता दि. २८ जूनपासून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हे आंदोलन शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
‘या’ आहेत 7 मुख्य मागण्या
- शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये मानधनवाढ देण्यात यावी
- कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
- थकित मानधन तत्काळ द्यावे,
- शासकीय सेवेचा लाभ देण्यात यावा.
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १२ महिन्यांत वेतन देण्यात यावे
- योजनेचे खासगीकरण करण्याचा डाव रद्द करावा,
- पटसंख्या कमी झाल्यास ‘शापोआ’ च्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात करु नये