सातारा प्रतिनिधी । सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी सातारकरांसाठी हिल मॅरेथॉन स्पर्धा भरविली जाते. या स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली असून यंदा हिल मॅरेथाॅन दि. १ सप्टेंबरला होणार असून त्याचा सराव दि. १२ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी हिल मॅरेथॉन आयोजकांची नुकतीच बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. अदिती घोरपडे यांची तर उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरी विशाल ढाणे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे रेस डायरेक्टर म्हणून अभिषेक भंडारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे म्हणाले, ‘स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबरला रोजी होणार आहे. एक्स्पो हा शुक्रवार, दिनांक ३० आणि शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शेंद्रे येथे आहे. जिल्ह्यातील आधारकार्ड असलेल्या स्थानिक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये प्राधान्य देणार असून त्यांना फीमध्ये सवलत असणार आहे.
१६ आठवड्याचा लाॅंग रन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून हे प्रशिक्षण दि. १२ मे पासून पोलीस परेड ग्राउंड, सातारा येथे सकाळी ५.४५ वाजता सुरु होईल. मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रतापराव गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी गेल्या वर्षीचा स्पर्धेचा सविस्तर अहवाल आणि अंदाजपत्रक सादर केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष अॕड. कमलेश पिसाळ यांचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सचिव डॉ. रंजिता गोळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.