साताऱ्यातील शेतमजुराच्या मुलाला ऑलिम्पिक पदकाची हुलकावणी; पराभव झाला, पण कामगिरी शानदार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील भूमिहीन शेतमजुराचा मुलगा प्रवीण जाधवनं काल (सोमवारी) सायंकाळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आर्चरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. त्याच्या कामगिरीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. मात्र त्याच्या संघाला उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. फलटण तालुक्यातील सरडे गावचा प्रवीण रमेश जाधवची 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठीही निवड झाली होती. भूमिहीन शेतममजुराचा मुलगा असलेल्या प्रवीणकडून क्रीडाप्रेमींना पदकाची खूप आशा होती. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या पराभवातही प्रवीण जाधवनं शानदार कामगिरी करत सर्वाधिक गुण मिळवले.

ऑलिम्पिक खेळाडूच्या कटुंबांचं वास्तव्य झोपडीत

शेतमजुरी करणाऱ्या रमेश आणि संगीता जाधव यांच्या पोटी प्रवीणचा जन्म झाला. फलटण तालुक्यातील सरडे गावात त्याचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्याचे आजी-आजोबा शेती महामंडळामध्ये कामाला होते. शेती महामंडळाच्या जागेतील झोपडीत त्याचे कुटुंबीय राहतात. आई-वडील आजही मजुरी करतात. गावातील जिल्हा परिषद शाळेत त्याचं शिक्षण झालं. सुरूवातीला प्रवीणनं 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. मात्र, शारिरीक क्षमतेअभावी त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर क्रीडा शिक्षक भुजबळ यांनी त्याच्या प्रशिक्षण आणि आहाराची अर्थिक जबाबदारी घेतली होती.

अमरावतीच्या शासकीय क्रीडा प्रबोधिनीत तिरंदाजीचा सराव

पुण्यातील बालेवाडीत एक वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 2006 ते 2011 या कालावधीत अमरावतीतील शासकीय धनुर्विद्या क्रीडा प्रबोधिनीत तो दाखल झाला. प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनात त्यानं तिरंदाजीचा कसून सराव केला. 2016 मध्ये बँकॉकमधील आशियाई चषक स्टेज वन स्पर्धेत रिकर्व्ह गटात प्रवीणनं कांस्यपदक पकाटवलं. त्याच वर्षी जागतिक तिरंदाजी स्पर्धेत त्यानं भारताच्या ब संघाचं प्रतिनिधीत्व केलं. या जोरावर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रवीण पात्र ठरला होता.

साताऱ्याची उज्ज्वल क्रीडा परंपरा

दिवंगत खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीमध्ये पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. साताऱ्याची ही क्रीडा परंपरा आता तिरंदाज आदिती स्वामी, प्रवीण जाधव पुढं नेत आहेत. आदिती स्वामी हिनं 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं. वरिष्ठ पातळीवर सुवर्णपदक पटकावणारी ती सर्वात लहान वयाची पहिली भारतीय तिरंदाज ठरली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवीण जाधव हा देखील अचूक लक्ष्य भेद करुन पदक पटकावेल, अशी सातारकरांना अपेक्षा होती.