‘फाशीच्या वडा’खाली शिकवला विद्यार्थ्यांना हुतात्म्यांचा धडा; साताऱ्यातील ‘या’ शाळेचा अनोखा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक इतिहासिक ठिकाण असलेल्या ‘फाशीचा वड’ या क्रांतिकारी ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी पाच क्रांतिकारकांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले, तर सहा जणांना गोळ्या घातल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना या प्रेरणास्थळी घेऊन जाऊन ‘ते अमर हुतात्मे झाले’ या कवितेचे वाचन करण्याचा अनोखा उपक्रम राबविला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली. मात्र, शिक्षिका वाघमोडे यांनी इयत्ता तिसरीचा वर्ग दप्तरासह फाशीचा वड म्हणजेच हुतात्मा स्मारक येथे नेला. येथे जाऊन त्यांनी प्रथम हुतात्मा स्मारकाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्रांतिकारकांना फाशी कशी दिली होती, त्यांना तोफेच्या तोंडी कसे दिले होते, गोळ्या कशा घातल्या गेल्या याची माहितीही विद्यार्थ्यांनी चित्ररूपात जाणून घेतली. हे सर्व दृश्य पाहून विद्यार्थी भावुक झाले. त्यानंतर शिक्षिका वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना याच ठिकाणी ‘ते अमर हुतात्मे झाले’ ही कविता शिकवली.

शिक्षिका आशा वाघमोडे यांच्याकडे इयत्ता तिसरीचा वर्ग आहे. याच वर्गातील भाषा विषयात ‘ते अमर हुतात्मे झाले’ ही कविता आहे. वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना ही कविता वर्गात न शिकवता हुतात्मा स्मारक येथे शिकवण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनीही या कल्पनेचे स्वागत केले.