सातारा प्रतिनिधी । ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर दुसऱ्या, तर सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी ९०.८६ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यात १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमापासून ते कार्यपद्धतीपर्यंत बदल होत आहे. यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच ‘डिजिलॉकर’ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यास ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’, असे म्हणतात.
युनिफाइड डिस्ट्रिक्ट ॲण्ड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच ‘यू-डायस’ पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी केली जात आहे. येथे व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६५५ शाळांमधील ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांंपैकी आतापर्यंत ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्याचे ९०.८६ टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्हा राज्यात अव्वल आहे.