सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याने सध्या कृषी क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. कृषी क्षेत्रात अधिक प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकारने देखील बांबू लागवड अभियान मनरेगाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड केली होती. यानंतर अभियानाला गती मिळाली असून, सातारा जिल्ह्यात सध्या एक हजार ७४५.४३ हेक्टरवर सहा लाख २२ हजार १८४ रोपांची लागण करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या बांबू लागवड योजनेत सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत बांबू लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यास ११०१०.०६ हेक्टरचे उद्दिष्ट दिल्यानंतर ग्रामपंचायत विभागास ७ हजार ७२० हेक्टर, सामाजिक वनीकरण ४२०.०६ हेक्टर आणि कृषी विभागास २ हजार ८७० हेक्टर असे उद्दिष्ट वाटप आले. प्रत्येक ग्रामसेवक व कृषी सहायकांना किमान १० एकर बांबू लागवडीचे उद्दिष्ट दिले. त्यानुसार तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांनी गावांमध्ये भेटी देऊन जनजागृती केली बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत प्रोत्साहन देऊन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाकून बांबू, फळबाग लागवडीसाठी जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात आहे. त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बांबू लागवड अभियान गतीने सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागामार्फत वैयक्तिक क्षेत्रावरील एक हजार १२९.२२ हेक्टरवर सद्यःस्थितीत कामे सुरू केली आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत मनरेगांतर्गत २४.६६ हेक्टरवर, तर कृषी विभागामार्फत मनरेगाअंतर्गत सद्य:स्थितीत ६१२.२८ हेक्टरवर ७६८ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लागवड करण्याचे काम सुरू केले आहे.
11 हजार 258 प्रस्तावांना मंजुरी
सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त बांबू लागवड व्हावी यासाठी राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण नऊ हजार २४१.६९ हेक्टरसाठी १४ हजार ६०३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी सात हजार १९.३४ हेक्टरसाठी ११ हजार २५८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर एक हजार ९२३.१६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.