सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा रुग्णालयात ब्लड बॅंकेप्रमाणचे मिल्क बॅंकही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळून लहान मुलांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वाधिक प्रसूती होत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात एक हजार स्क्वेअर फूट जागा लागणार आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांची मदत घेतली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात मिल्क बॅंकेचा प्रकल्प नाही. त्यामुळे दूध कमी असणाऱ्या मातांच्या बाळांच्या वाढीवर मर्यादा येतात. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. कोल्हापूरमध्ये असलेल्या अशा प्रकल्पाच्या पाहणीसाठी नुकतेच एक पथक पाठविले होते. येत्या दोन दिवसांत त्यावर चर्चा करून प्रकल्पाला अंतिम स्वरूप देणार आहे.