सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ६०० घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार १७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले असून, २१० अपात्र लाभार्थींना आवास प्रणालीतून वगळण्यात आले आहे. मंजुरी दिलेल्या लाभार्थीमधील आधार लिंक बँक खाते असलेल्या दोन हजार ४२२ लाभार्थींना घरकुलासाठी प्रथम हप्ता १५ हजार रुपयांप्रमाणे वितरणाचे काम पूर्ण झाले आहे.
राज्यस्तरावर घरकुल मंजुरी व हप्ता वितरणाच्या कामात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेचे तत्कालीन प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी विविध घरकुल योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली. श्री. हराळे यांच्या बदलीनंतर प्रभारी प्रकल्प संचालक अर्चना वाघमळे यांनीही या विभागाचा कारभार गतिमान केला.
तालुकास्तरावरील गटविकास विकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, लिपिक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डेटा ऑपरेटर यांच्या माध्यमातून मंजुरीचे काम गतिमान सुरू आहे. मंजुरी दिलेल्या सर्व लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन घरकुल बांधकामाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.