कराड प्रतिनिधी | आपल्या दहशतीने लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४४, रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा) याचा कोयत्याने वार करून खून करण्यात असल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित हल्लेखोर गणेश विनोद मोरे (वय १९, रा.आहिल्यानगर, कुपवाड) याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाल्याचे MIDC पोलीसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील कुख्यात गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर गुंड दाद्या सावंत याच्या खूनासह हत्या, मारामारी, दहशत पसरवणे, खंडणी यासारखे अनेक गुन्हे दाखल होते. सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील राहणाऱ्या सच्या टारझन याची सांगलीसह महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत होती. तो एका खूनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला होता. त्याचे अहिल्यानगरमधील एका महिलेशी तीन वर्षापासून अनैतिक संबंध असल्यामुळे रविवारी मध्यरात्री सच्या त्या महिलेकडे मुक्कामासाठी आला होता.
या ठिकाणी सच्या टारझन झोपलेला असताना पाहून गणेश विनोद मोरे या तरुणाने नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा राग मनात धरून सच्याच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताची बोटेही तुटली. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित हल्लेखोर मोरे हा स्वत:हून पोलिसात हजर झाला. या घडलेल्या घटनेमुळे सांगली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.