सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, व कंपन्यांतील संचित तोट्यातील महामंडळाची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कोरेगाव तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण, संदीप माने, आनंदराव जाधव, अन्वर पाशाखान, डॉ शंकरराव पवार, मालन परळकर, मनोज्ञ तपासे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे मात्र महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केली आहे. दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळात सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे आर्थिक बेशिस्तपणा वाढला आहे. यामध्ये भर म्हणून या सरकारचे कमीशन राज जोरात सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले पण त्यामधून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकार त्यांच्या मित्रांचे भले करत आहे.
राज्यातील ११० सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, व कंपन्यांतील ४१ महामंडळाचा तोटा पन्नास हजार कोटींच्या वर गेला आहे. हा सर्व पैसा मंत्री, अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात गेल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. हा सर्व पैसे हा राज्यातील जनतेचा असून हा पैसा नेमका कुठे खर्च झाला याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे. याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.