कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पशुसंवर्धन उपायुक्त असलेल्या डॉ. अंकुश परिहार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. दिनकर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ दिला जाईल. तसेच पशूंच्या आजारांच्या बाबतीत लक्ष देऊ. यासाठी आपण लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती डॉ. बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
सातारा जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील पशूंची विशेष काळजी घेतली जात आहे. कारण लम्पिमुळे आतापर्यंत ३० हुन अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान, पशु संवर्धन विभागाकडून वारंवार तपासणीची मोहीम राबविली जात आहे. सातारा जिल्ह्यात अकरा तालुक्यात दोन श्रेणीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये एकूण ५८ दवाखाने आहेत. तर द्वितीय श्रेणीमध्ये ११३ दवाखाने आहेत. या दवाखान्यातून ग्रामीण भागातील पशूंवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुसंवर्धन उपायुक्तांकडून जिल्ह्यातील असलेल्या इतर पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात असलेले काम पाहिले जाते. यापूर्वी पशु संवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार काम पाहत होते. त्यांची बदली झाल्यानंतर उपायुक्त पदाचा तात्पुरता पदभार हा डॉ. व्ही. टी. सावंत यांच्याकडे देण्यात आला होता.
सोमवारी राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभागाने पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांना पदोन्नती दिली आहे. त्यानुसार आपला सातारा येथे पशुसंवर्धन उपायुक्त पदावर नियुक्तीबाबतचा आदेश उपसचिवांनी काढला असल्याची माहिती डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.