कराड प्रतिनिधी । नुकतीच मंजूर झालेलया सातारा-दादर व्हाया मिरज-पंढरपूर एक्सप्रेस (Miraj-Pandharpur Express) रेल्वेचे शनिवारी कराड येथील रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरू होण्यासाठी पुणे येथे झालेल्या सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे.
दरम्यान, शनिवारी हि गाडी सातारा येथे दाखल झाल्यानंतर क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य अँड. विनीत पाटील व स्थानिक सल्लागार समिती सदस्य विकास कदम यांनी स्वागत केले तर कराड येथे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य श्री.गोपाल तिवारी व माजी रेल्वे सल्लागार समिती सदस्य निवास डुबल, स्थानिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य योगेश मालानी यांनी स्वागत केले.
ही गाडी सातारा येथून सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी दुपारी ३ वाजता सुटेल. दुपारी ४ वाजून 18 मिनिटांनी कराड येथून सुटून वाया मिरज व पंढरपुर मार्गे दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पोहोचेल. सदर गाडी दररोज सोडण्याबाबत सर्व सल्लागार समिती सदस्यांनी रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर या गाडीस “चंद्रभागा” एक्सप्रेस असे नाव देण्याबाबत मागणीपत्र देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे यांनी सांगितले असल्याची माहिती क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य श्री.गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
मिरज-पंढरपुर एक्सप्रेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा : तिवारी
सातारा – दादर व्हाया मिरज-पंढरपुर एक्सप्रेस या रेल्वेला कराड रेल्वे स्टेशनवर देखील थांबा देण्यात आलेला आहे. सातारा येथून सोमवार, मंगळवार व शनिवार या दिवशी दुपारी ३ वाजता सुटणारी हि एक्सप्रेस दुपारी ४ वाजता कराड येथे पोहचणार आहे. या विशेष रेल्वेचा कराडसह परिसरातील प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती कराड रेल्वे स्थानकाचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य श्री. गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.