सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक क्रांतीमध्ये ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने झोकून देवून काम करावे, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
सातारा जिल्हाधिकारी डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडील यंत्रणा, गट शिक्षणाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगली शिक्षण विभागाचे पथक बोलविण्यात आले होते. या पथकाशी जिल्हाधिकारी डुडी यांनी संवाद साधला.
यावेळी सातारच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सांगलीचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, कार्यकारी अभियंता सचिन अहिरे, सांगलीच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विमल माने, डायटचे प्राचार्य श्री. कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला होता. सांगली जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा यांच्याद्वारे शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी या उपक्रमामध्ये प्रत्येक माणसाचा सहभाग खूप महत्वाचा आहे. गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण आहे. या उपक्रमामध्ये शिक्षकांनी त्यांच्या संपूर्ण क्षमता प्रदान कराव्यात यासाठी त्यांच्या प्रशासकीय प्रश्नांचा निपटारा करा. सातारा जिलह्यामध्ये सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्धतेची क्षमता फार मोठ्या प्रमाणावर आहे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत निवडलेल्या शाळांना भेटी देवून त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा आराखडा तयार करावा.
जिल्ह्यात 28 हजार विद्यार्थ्यांकडे बायज्युस ॲप
सातारा जिल्ह्यात प्रत्येक विषयाचे मास्टर ट्रेनर्स तयार करावेत. जिल्ह्यात 28 हजार विद्यार्थ्यांकडे बायज्युस ॲप आहे. तो ॲप सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावा. सायन्स, कॉप्युटर लॅब तयार कराव्यात. गट शिक्षणाधिकारी यांनी हा आपला वैयक्तीक उपक्रम समजून यामध्ये योगदान द्यावे. दुर्गम भागात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यात ज्या पद्धतीने हा उपक्रम यशस्वी झाला. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.