सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा मार्च महिन्यातच चांगलाच तापला असून सातारा शहराचा पारा तर ३९ अंशाच्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. सर्वत्र दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडत असून चांगला चटकाही जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही- लाही होत आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्हा पारा अनेकवेळा ४० अंशावर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात अगोदरच लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असताना आता कडक उन्ह पडत असल्याने मोकळ्या हवेतील वातावरण देखील तापू लागले आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. तसेच थंडीही कमी राहिली. हिवाळ्यात ११ अंशाच्या खाली तापमान घसरले नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यातच थंडी कमी राहण्याने फेब्रुवारीच्या मध्यापासूनच पारा वाढत चालला होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागलेली.
मार्च महिना सुरू झाल्यानंतर मात्र, रखरखते ऊन पडू लागलयामुळे यंदाचा उन्हाळा कडक असणार असा अंदाज होता. सध्याची स्थिती पाहता उन्हाळा सर्वांनाच तापदायक ठरणार हे स्पष्ट झालेले आहे. मार्च महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्याचे कमाल तापमान वाढू लागले. त्यामुळे सकाळी नऊनंतर ऊन वाढत जात आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हाचा कडाका असतो. सातारा शहराचा पारा तर रविवारी यावर्षी प्रथमच ३८ अंशावर पोहोचला. तर पूर्व माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागातील तापमान ३९ अंशावर जाऊ लागले आहे.
दुपारी १२ नंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी
सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे करणारे शेतकरी आणि मजुरांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. तरीही सध्या रब्बी हंगामातील पीक काढणी आणि मळणी वेगाने सुरू असल्याने कडाक्याच्या उन्हातही काम करण्याची वेळ सर्वांवरच आलेली आहे. तर सातारा शहरात दुपारी १२ नंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झालेली आहे. नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. सायंकाळी सहानंतरच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात अनेकवेळा पारा ३९ ते ४२ अंशादरम्यान राहतो.
रविवारी असे होते सातारा शहराचे कमाल तापमान
दि. १० मार्च ३७.२, ११ मार्च ३६.९, १२ मार्च ३७.७, १३ मार्च ३७, १४ मार्च ३६.८, दि. १५ मार्च ३६.२, १६ मार्च ३५.४, १७ मार्च ३६.६, १८ मार्च ३५.५, १९ मार्च ३६, २० मार्च ३५.८, दि. २१ मार्च ३६, २२ मार्च ३७, २३ मार्च ३७.२, दि. २४ मार्च ३८.५