सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला सोमवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपले. सोमवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानकपणे आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. मात्र, आठवडा झाला तरी मान्सून दाखल झाला नाही. त्यानंतर एक ते दोन दिवसांत मान्सून जिल्ह्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार आज सोमवारी सकाळपासून सातारा शहराबरोबरच पश्चिम भागातील वातावरण बदलू लागले. उन्ह कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले.
साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित pic.twitter.com/ELz0CnDquh
— santosh gurav (@santosh29590931) June 12, 2023
तर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरातील नागरिकांची, विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली. झाडे हलू लागली तसेच घरावरील पत्र्यांचा आवाज येऊ लागला. त्यानंतर पावसाची जोरदार सर बरसली. वारा आणि पावसामुळे शहरातील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला. दरम्यान, सातारा शहरात मान्सून दाखल झाल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे.