कराड प्रतिनिधी । सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी सोमनाथ चंद्रकांत शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकात ते ऑन ड्युटी असताना ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सोमनाथ शिंदे (वय ४१, मूळ रा.वेळे कामथी ता.सातारा सध्या रा.मोळाचा ओढा, सातारा) हे सोमवारी बॉम्बे रेस्टारंट चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी सपोनि अभिजीत यादव व सुहास शिंदेही त्यांच्यासोबत होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रस्त्याच्या बाजूला येताच अचानक ते कोसळले. यावेळी पोलिस तसेच परिसरातील नागरिक गोळा झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्यांना वाहनातून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराला घेतल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना त्यात यश आले नाही. घडलेल्या घटनेची व त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांच्या वतीने शिंदे यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
यावेळी कुटुंबिय, नातेवाईक, पोलिस व सोमनाथ शिंदे यांच्या मित्रपरिवाराने रुग्णालयातच आक्रोश केला. अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. सांयकाळी उशीरा त्यांच्यावर माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा पोलिस दल, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोमनाथ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाउ असा परिवार आहे. 2006 साली ते सातारा पोलिस भरती झाले होते. पोलिस मुख्यालय, सातारा शहर, शहर वाहतूक विभागात सेवा झाली आहे.