सातारा प्रतिनिधी | सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने नजर चुकवून घरात घुसून लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्यास अटक केल्याची घटना काल घडली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा लॅपटाॅप, तीन मोबाइलसह स्पोर्ट बाइक हस्तगत केली आहेत.
दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे (वय २३, रा. कोडोली, सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गोडोली आणि औद्योगिक वसाहतीमधील एका प्रशिक्षण केंद्रातून भरदिवसा एका चोरट्याने लोकांची नजर चुकवून मोबाइल आणि लॅपटाॅप चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी करत होते.
तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागला. त्या अनुषंगाने सलग तीन दिवस पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणी चाैकशी केली. त्यावेळी संशयित खवळे हा किती वाजता जातो, येतो याची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून खवळे याला रविवारी रात्री साडेदहा वाजता दत्तनगर, कोडोली येथे अटक केली. त्याने चाेरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटाॅप, तीन मोबाइल, स्पोर्ट बाइक, असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड आदींनी ही कारवाई केली.