कराड प्रतिनिधी । रा. ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्कार दिला जातो. २०२४ वर्षाचा ३४ वा पुरस्कार हा कराडच्या कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा विश्व विद्यापीठ, कराडचे कुलगुरू आहेत. डॉ. भोसले हे नामांकित सर्जन असून मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर १९८५ पासून कृष्णा इन्स्टियूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड येथे त्यांनी कार्य सुरू केले. प्रोफेसर, विभागप्रमुख पासून ते कुलपती पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या ते सांभाळत आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन म्हणून ते काम बघतात. २०१९ पासून कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती ही जबाबदारी ते कौशल्याने पार पाडत आहेत.
कृष्णा हॉस्पिटलचा विस्तार, आधुनिकीकरण व त्यामार्फत समाजसेवा, सभासद शेतकऱ्यांचे हीत ते बघत आहेत. आता शिरवळ येथे नवीन कॉलेज व विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. कृष्णा सह. साखर कारखान्याचे, १९९९ पासून चेअरमन आहेत. ४५ हजार सभासद व २ हजार कामगारांचे हित बघत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा ते प्रयत्न करत आहेत. २००७ साली त्यांनी जयवंत शुगर्स हा नवीन कारखाना सुरू केला. २००३ साली कृष्णा शेतकी कॉलेज सुरू केले. कृष्णा सह. बँकेचे चेअरमन म्हणून डॉ. सुरेश भोसले यांचे मोठे योगदान आहे.
कला, क्रिडा, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व आपल्या उत्तुंग यशाने साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना १९९१ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. आतापर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, सयाजी शिंदे, राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, यमुनाबाई वाईकर, फारूख कूपर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रताप गंगावणे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रणजित जगताप यांसारख्या दिग्गज व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. भोसले यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड रा. ना. गोडबोले ट्रस्टतर्फे अरूण गोडबोले, प्रा. पुरुषोतम शेठ, ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समितीद्वारे करण्यात आली आहे. लवकरच पुरस्कार प्रदान कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे ट्रस्टी अशोक गोडबोले, उदयन गोडबोले व डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली आहे.