सातारा प्रतिनिधी | अयोध्या येथील रामल्लांची प्राणप्रतिष्ठापनेनंतर दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक जाणार आहेत. या भाविकांसाठी एसटी महामंडळाने सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही एकाच प्रवासात पाच ठिकाणी साडेसात हजारांत देवदर्शन मिळणे शक्य होणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरला सातारा येथून पहिली बस जाणार असून, त्यामधून ४५ भाविक सहभागी होणार आहेत.
सातारा येथून जाणाऱ्या भाविकांचा सातारा ते अयोध्या या मार्गावर पहिला मुक्काम शेगाव येथे होणार आहे. त्या ठिकाणाहून दुसऱ्या दिवशी निघाल्यानंतर थेट अयोध्येला बस जाईल. सातारा येथून निघाल्यानंतर सातारा ते अयोध्या हा प्रवास ४८ तासांचा राहणार आहे. एसटीमध्ये दोन चालक राहणार आहेत. बसमधून जाणाऱ्या प्रवाशांनी स्वखर्चाने राहणे, जेवण व नाश्त्याची सोय करायची आहे.
अशी होणार बस आरक्षित
एसटी बसमध्ये एकूण ४५ सीट आरक्षित केल्या जाणार असून, ग्रुपद्वारे आरक्षित केल्यास बस सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून बसचे आरक्षित लवकर होणे शक्य होणार आहे. या आरामदायी बस असून, पुशबॅगची सीट, एअर सस्पेन्शन, चार्जिंगची सोय असणार आहे.
मार्गाची केली पाहणी
सातारा ते अयोध्या अशी विशेष बससेवा सुरू करण्यापूर्वी सातारा आगारातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यात प्रवासादरम्यान कोणत्या टप्प्यासाठी किती वेळ, विश्रांतीच्या ठिकाणांची निश्चिती व अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.