तवेरा गाडीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक; भीषण अपघातात 3 ठार, 4 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर सातार्‍यातील बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलानजीकच्या हुंडाई शोरूमसमोर तवेरा गाडीने बोलेरो पिकअपला पाठीमागून धडक दिली आहे. या भीषण अपघातात तवेरा गाडीतील तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे, अशी मृतांची नावे आहेत. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातातील जखमींना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहने थांबल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रक्षा विसर्जनसाठी जात असताना अपघात

अपघातातील मृत आणि जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील असल्याचे समजते. मृत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जन विधीसाठी ते सातारला आले होते. महामार्गावर गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. जखमींमधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.