सातारा प्रतिनिधी | न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद करायची असताना त्यासाठी 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडीच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुकाराम शामराव नरळे (वय 36, रा. पानवन, ता. माण) असे या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी येथील साडेतेरा एकर जमिनीबाबत म्हसवड न्यायालयात दावा सुरु होता. त्याचा निकाल होऊन सदर जमीन तक्रारदार यांचे पती व दीर यांच्या नावे करण्याचा आदेश झाला. त्याप्रमाणे फेरफार ला नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी तुकाराम नरळे
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी अकरा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 9 हजार रुपये देण्याचे ठरले.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने सापळा लावला. तलाठी नरळे यास म्हसवडमधील ढोर कारखान्यासमोर लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलीस नाईक निलेश चव्हाण, प्रशांत नलावडे मारुती अडागळे, पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी सहभाग घेतला होता.
लाच मागितल्यास संपर्क साधा
शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उज्ज्वल वैद्य यांनी केले आहे.