साताऱ्यात ACB ची मोठी कारवाई; 5 लाखांच्या लाच प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशासह चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात आज पुणे-सातारा अँटीकरप्शन विभागाच्या वतीने संयुक्तिकपणे मोठी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायपालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद कारण्यात आला. हा प्रकार दि. ३, ९ तसेच १० डिसेंबर रोजी घडला आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, तक्रादार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे अटक करण्यात आली. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.