सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस जरी कोसळत असला तरी काही गावात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात सध्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) गावात गेल्या वर्षभरापासून टँकर सुरु आहे. गावातील लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत असल्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आली आहे. इतकेच नाही तर गावात पाण्याच्या १४ टाक्या असून देखील टाक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे.
जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सासवड हे गाव असून पाच हजारांच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने गावाला १४ जूनपासून टँकर सुरू झाला तो आजही बंद नाही. गावात पाणी टंचाई भासू नये म्हणून गावास कायम पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमारे १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातील अनेक टाक्यांत पाणीच कधी पडले नाही, असे ग्रामस्थांकडून सांगितले सांगतात. तर गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा होतो.
भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजना असून देखील या योजना गावात आल्या नाहीत. कालव्याला पाणी आले तरच पेयजल योजना सुरू राहते. गावाला सध्या ५५ हजार लिटर पाणी मंजूर आहे. टँकरद्वारे माणसी २० लिटर, मोठ्या जनावरांना ३५ आणि लहान जनावरांना १० लिटर याप्रमाणे पुरवठा होतोय. हे पाणीही पुरेसे होत नाही. यासाठी गावाने एक लाख लिटर पाणी मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. यासाठी खासगी टँकरमधून पाणी घ्यायचे झाल्यास १२०० रुपयांना ५ हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातच गावात जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठीही विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.