सातारा प्रतिनिधी | वित्तीय समावेशनामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा अधिकाधिक लाभ नागरीकांना व्हावा या उद्देशाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या तीन महिन्याच्या कालावधीत सर्व ग्रामपंचायतस्तरावर बँकांनी अभियान राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
प्रधानमंत्री जनधन योजनेतील बंद पडलेली खाती सुरु करण्यासाठी केवायसी पुनःपडताळणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील एकूण कुटुंब संख्येच्या ४ टक्के कुटुंबे अद्याप बँकींग सेवेपासून वंचित आहेत. अशा कुटुंबांना या शिबीराच्या माध्यमातून जनधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तीन महिन्याच्या कालावधीत दर शनिवारी विशेष आयोजन करावे, स्थानिक लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी यांना शिबीरामध्ये आमंत्रित करावे. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनेतील लाभार्थी संख्या वाढवावी. बँक सेवेपासून वंचित असलेल्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिबीरांचे आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांकडे देण्यात यावी. ग्रामपंचायत मुख्यालय किंवा सर्वांना सोयीच्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करावे. बँकेच्या वरीष्ठ अधिकारी यांनी शिबीरांच्या ठिकाणी भेटी देण्याबाबत नियोजन करावे. गट, गाव व पंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभियानात सहभाग नोंदवावा. तालुक्यातील सर्व अधिकारी यांना ग्रामपंचायत निहाय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करावे व या नोडल अधिका-यांचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.