सातारा प्रतिनिधी | कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांमधील पर्यटन वाढीबरोबर तेथील नागरिकांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रायमो कपंनीबरोबर विविध विभागांनी समन्वय साधून आराखड्यानुसार प्रलंबित विकास कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्पाचा आढावा जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कांदाटी खोऱ्यात कृषी उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना करुन या खोऱ्यात मुख्य पीक भात आहे. तेथील पोषक वातावरणानुसार फळबाग लागवड, नाचणी, लेमन ग्रास यासारखी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. कंदाटी खोऱ्यात मधाचेही उत्पन्न घेतले जात आहे. जे उत्पादकांना मधाच्या पेट्या जास्तीच्या उपलब्ध करुन द्याव्यात.
कांदाटी खोऱ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी होम स्टेच्या सुविधा आहेत. या होम स्टेमध्ये आणखी सुविधा कशा निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर स्थानिकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळण्यावर भर द्यावा. त्यांचा आर्थिकस्तर कसा उंचावले हे पहावे. कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत प्रायमो कंपनी व शासनाचे विविध विभाग काम करित आहे. काम किती पूर्ण झाले, झालेल्या कामांमधून तेथील नागरिकांना किती लाभ होत आहे याची माहितीही पुढील बैठकीत द्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.