सातारा प्रतिनिधी । दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात एक आगळेवेगळे उद्यान उभारले जात आहे. ते उद्यान म्हणजे कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान होय. पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धांत शहीद झालेले जवान, त्यांचे नाव, कोणत्या युद्धात हुतात्मा झाले व हुतात्मा झालेली तारीख अशी माहिती असलेल्या एकूण २६३ जवानांच्या कोनशीला या स्मारकात लावण्यात आल्या आहेत.
येथील हुतात्मा स्मारकातील १४ गुंठे जागेत आकाराला येत असलेल्या कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर २६३ हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली आहेत. कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १७ नोव्हेंबर २०१५ मध्ये साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.
त्यांचे शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले होते. त्यांच्या आठवणी तरुण पिढीला प्रेरणा देत राहाव्यात, या हेतूने सातारा पालिकेने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावाही केला. साताऱ्यातील हुतात्मा स्मारकातील १४ गुंठे जागेत हे उद्यान आकाराला येत आहे.
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून पहिल्या टप्प्यात १ कोटी ३२ लाख तर दुसऱ्या टप्प्यात विविध योजनातून दोन कोटींचा टीं निधी मंजूर झाला. कोरोनामुळे कामकाजात खंड पडला होता. परंतु दोन वर्षांपासून हे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानात स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, भिंतीवर सातारा जिल्ह्यातील २६३ शहीद जवानांच्या नावाची कोनशीला लावण्यात आली आहे.