सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फलटण विधानसभा मतदार संघात करेक्ट कार्यक्रम केला आहे. अजितदादांच्या पक्षातील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या मतदार संघता आहे. मात्र, अद्यापही रामराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण हेही संजीवराजेंसोबत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण हे दि. 14 ऑक्टोबर रोजी फलटण येथे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी मोठ्या विश्वासाने ज्या उमेदवाराला विधानसभेचं तिकीट दिलं त्याचे घात करुन दादांची साथ सोडली आहे. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत तुतारीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या फलटणच्या राजकारणाची कुजबूज राज्यात सुरू झाली आहे.
फलटण येथील 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुतारी सोबत जाण्याचा घेतला निर्णय आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका आपली असल्याचं रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
बैठकीत चर्चा नंतर थेट जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार दीपक चव्हाण, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर संजीव राजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी 14 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यामध्ये तुतारी चिन्हाच्या सोबत जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. मात्र माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवत या पुढील काळात महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या बैठकीत जाहीर केली आहे.
अजितदादांची साथ सोडणार नाही; रामराजे नाईक निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण शहर व फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले असल्याने त्यांची साथ सोडणार नसल्याचे रामराजे यांनी सांगितले. यामुळे रामराजे लवकरच तुतारी हाती घेणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.