कराड प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीचे गुलाम असून त्यांची दीड वर्षे दिल्लीत मुजरा करण्यात गेली असल्याची सडकून टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांच्या निधनानंतर श्रीनिवास पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी खा. राऊत कराडला आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला.
खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम झाले आहेत. ते ईडीला घाबरून पळाले आहेत . अशा पळपुट्या मुख्यमंत्र्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, दिल्लीच्या गुलाम माणसाची दीड वर्षे मुजरा झाडण्यातच गेली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान, बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण, यापैकी त्यांच्याकडे काय आहे? ते सत्तेसाठी हापापलेले लोक आहेत. आम्ही मात्र तसे नाही. आम्ही लढू आणि तुम्हाला गाडू, असा इशारा खा. राऊतांनी दिला.
साताऱ्यातील महायुतीच्या मेळाव्याबद्दल बोलताना खा. राऊत म्हणाले, उदयनराजे महायुतीचे नेते आहेत. त्याबद्दल मी काय बोलणार. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाशी त्यांनी इमान राखले पाहिजे. शिवसेना ही ताठ मानेने जगणारी शिवसेना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफंग्यानचे नेतृत्व करणाऱ्या सरदाराची होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले आहे. म्हणून हा महाराष्ट्र आजही ताठ मानेने उभा आहे.