सातारा प्रतिनिधी । स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. स्वारगेट बसस्थानकाचे प्रकरण ताजे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि सातारा जिल्ह्यातील भाजप नेता असलेल्या एका मंत्र्यावर खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे. खासदार राऊत यांनी थेट नाव घेत मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले असून “स्वारगेटपद्धतीचं प्रकरण समोर येत आहे. सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जयकुमार गोरे यांना बडतर्फ करण्यासाठी त्या पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.
आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे नवीन पात्र तुमच्या मंत्रिमंडळात समोर आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. त्यांनी सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सर्व रत्नं, 14 आहेत की जास्त, ती त्यांनी तपासली पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याविषयी जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे.
या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहार. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय अशी विचारणा खा. राऊत यांनी केली आहे.
दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे यांच्यासारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे, पीडित महिलेसोबत राज्यपालांना भेटायला जाणार आहे. गोरे यांच्यासारख्या विकृत व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका, असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
जयकुमार गोरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्यावर आरोप करणाऱ्या…
आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे. “2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आले आहे. वडिलाच्या निधनानंतर अस्थिविसर्जनही करू दिलं नाही, विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण केले. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे. 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं, असं जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांची टीका
संजय राऊत यांच्या पाठोपाठ विजय वडेट्टीवार यांनी देखील जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार सरकारवर टीका करत म्हणाले की, “सध्या सरकारमध्ये उभा धिंगाणा सुरू आहे. एक पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आपले विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. दहा दिवस तुरुंगाची हवा खातो. पण, मंत्री झाल्यावर महिलेच्या मागे लागतो. आणखी एक महाभाग उत्तर महाराष्ट्रातील मंत्री माजी महिला राष्ट्रपतींची जमीन ढापतो. हा मंत्री मंत्रिमंडळात मान वर करून फिरतो. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते. सध्या काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली असून अशांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का?”