सातारा प्रतिनिधी | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा महाबळेश्वरातील मुक्काम चांगलाच वादग्रस्त ठरला. ईडीन सील केलेल्या वाधवान बंधूच्या बंगल्याला वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, अशी माहिती आरटीआय कार्यकर्त्यान मागवल्यानं सलमानने महाबळेश्वरातील आपला मुक्काम शुक्रवारी हलवला आणि थेट मुंबई गाठली.
सील केलेल्या बंगल्यात मुक्काम
डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरातील अलिशान बंगल्यात सलमान खानचं वास्तव्य चर्चेचं ठरलं. काही दिवसांपूर्वी ईडीनं कारवाई करत वाधवान बंधूचा बंगला सील केला होता. तसंच महागडी पेंटींग्ज,फर्निचर जप्त केली होती. सील असताना बंगल्याला वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सलमानने महाबळेश्वर सोडले आणि तो मुंबईकडे रवाना झाला.
आरटीआय अर्जामुळे प्रशासन अडचणीत
आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान हा महाबळेश्वरला आल्याची माहिती आला असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचा मुक्काम वाधवान बंधूच्या सील केलेल्या बंगल्यात असल्याची माहिती सर्वत्र समजली. ईडीने बंगला सील केला असताना बंगल्यातील वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, याची माहिती साताऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागवली आहे.
दाट धुक्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गावी जाण्याचा बेत रद्द
सलमान खान हा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) या मूळगावी जाणार होता. परंतु, दाट धुक्यामुळे सलमानला तिकडे जाता आले नाही. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सलमानची महाबळेश्वरात भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांच्या भेटीचे छायाचित्र समोर आलेले नाही. वाधवान बंधूच्या बंगल्याचे प्रवेशद्वार बंद होते. तसेच बंगल्याच्या परिसरात वाहनांचा ताफा आणि पोलीस बंदोबस्त होता.
वाधवान बंधूंची महाबळेश्वरात मोठी प्रॉपर्टी
डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंची महाबळेश्वर येथे मोठी जागा असून त्याठिकाणी दोन-तीन अलिशान बंगले आहेत. त्यातील एक बंगला ईडीने सील करून तिन्ही बंगल्यातील महागडी पेंटिंग व फर्निचर जप्त केलं होतं. सील केलेल्या बंगल्यातच सलमान खानचं वास्तव्य असल्याच समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. माध्यमांतून चर्चा व्हायला लागताच सलमानने महाबळेश्वरातूनच काढता पाय घेतला.