सातारा प्रतिनिधी | सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या सज्जनगड रन 2024 या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला.
रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, गजाननराव बोबडे ,प्रवीण कुलकर्णी गुरुजी, समर्थ भक्त विद्याधर बुवा वैशंपायन तसेच समर्थ मंडळाचे सहकारी संतोष वाघ ,राजाभाऊ कुलकर्णी, उत्तम तारळेकर व सज्जनगड वरील रामदासी मंडळींच्या उपस्थितीत गजवडी येथील अभयसिंहराजे भोसले विद्यालयाच्यावरील बाजूस असलेल्या स्वागत कमानीपासून ध्वज फडकावून करण्यात आली. स्पर्धा सुरू होताना मान्यवर उपस्थित यांच्या हस्ते तसेच सर्व स्पर्धकांनी समर्थ रामदास स्वामींच्या नावाचा जयजयकार करत मनाचे श्लोक म्हणत ही अनोखी सज्जनगड रन सुरू झाली.
हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या सज्जनगडच्या अतिशय चढण असलेल्या रस्त्यावरूनही हे धावपटू अतिशय लीलया हे अंतर धावत कापत होते. मार्गांमधील ज्ञानश्री इंजिनियरिंग इन्स्टिट्यूटच्या प्रांगणाबाहेर मार्गावर स्पर्धकांसाठी पाणी तसेच या धावपटूंना उत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मार्गावरून केशरी रंगाचे टी-शर्ट घातलेल्या धावपटूंना पाहताना वेगळेच रम्य दर्शन उपस्थिताना झाले.
त्यानंतर या स्पर्धेतील शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे सुमारे दीडशे पायऱ्यांची चढण पूर्ण करत हे सर्व धावपटू समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आल्यावर या सर्व धावपटूंचा रामनामी प्रसाद तसेच पुष्पगुच्छ देऊन समर्थ भक्त योगेश व रामदासी यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र, राम वस्त्र व सहभाग घेतल्याबद्दल अल्पोपहार देण्यात आला.