सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागामधील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांच्या ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महाडीक व त्यांच्या देवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संतश्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज पालखी सोहळा श्री. क्षेत्र सासवड ते श्री. क्षेत्र पंढरपूर पालखी रथासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांचा लाडका ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला. मेढा येथील बैल बाजारात २०२२ मधील सगळ्यात मोठी विक्रमी बोली करून ‘देवा’ या बैलाची महाडिक यांनी खरेदी केली होता. तोच बैल आज पालखीचा मानकरी ठरला आहे.
ह.भ.प. अविनाश महाराज हे बालपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. त्यांनी आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. गेल्या १५ वर्षापासून ते सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई आणि राज्यातील इतर जिल्ह्यातही कीर्तन सेवा करत आहेत. अविनाश महाराज हे ऐतिहासिक कीर्तनही करतात. महाडिक यांच्या ‘देवा’ या बैलाला हा मान मिळाल्यामुळे कुटुंबासह गावाची शान वाढली आहे.