सातारा प्रतिनिधी | फलटणचे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे आगामी काळामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कदम यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सद्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे.
काही दिवसांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथे काकडे कुटुंबीयांच्या घरी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यावेळी सुद्धा शरद पवार यांच्या समवेत सह्याद्री चिमणराव कदम हे सावली सारखे दिसत होते.
नुकत्याच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वडजल येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या पूर्वी शरद पवार हे कार्यक्रम स्थळी दाखल होताना शरद पवार यांच्या गाडीमध्ये सह्याद्री कदम सुद्धा होते.
या सर्व घडामोडींचा अंदाज घेता फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढील वाटचाली मध्ये युवा नेतृत्व म्हणून सह्याद्री चिमणराव कदम यांना पक्षामध्ये घेण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात? अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत.