पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तारळे-पाटण मार्गावर असणारे विस्तीर्ण पठार सध्या रंगीबेरंगी फुलांनी सजले आहे. पाटण तालुक्याचे प्रति कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पठारावरचे विविधरंगी गालिचे सध्या पर्यटकांना खुणावू लागले आहेत. याच परिसरात पसरलेले पवनचक्क्यांचे जाळेही परिसराची शोभा वाढवत आहे. या पठारावर अनेक प्रकारचे पशू, पक्षी, वनस्पती, सस्तन प्राणी आढळत असून याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक येथे येत आहेत.
तारळेवरून पाटणला जाण्यासाठी जळव व सडावाघापूर हे दोन मार्ग आहेत. जळवमार्गे जाताना घाट चढून जाऊन पुढे तो उतरावा लागतो. तर सडावाघापूरमार्गे जाताना करमाळे ते बांधवाट असा घाट चढून जावे लागते. त्यापुढे सडावाघापूर ते सडाकळकी यादरम्यान विस्तीर्ण पठार असून त्यापुढे मणदुरे फाट्यापर्यंत घाट उतरावा लागतो. या विस्तीर्ण पठारावर पवनचक्क्यांचे जाळे पसरले असून येथे उलटा धबधबाही आहे. वर्षभर ऊन पावसात या पठारावर विविध प्रकारे आनंद लुटता येतो.
तारळेपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पठारावर पावसाळ्यात दमदार पाऊस, सोसाट्याचा वारा, दाट धुके असे विहंगम दृश्य दिसून येते. जून ते हे डिसेंबरअखेर अनेक प्रकारची जैवविविधता या परिसरात आढळून येते. कृष्ण गरुड, सर्प गरुड, तुरेवाला गरुड, तुरमती ससाणा, शिक्रा, खरुची हे स्थानिक पक्षी येथे आढळून येतात. तर हिवाळ्यात स्थलांतर – करून येणारी अनेक जातींची व दुर्मीळ गिधाडे व घुबडे आढळून येतात. सध्या संपूर्ण पठारावर हिरवळ पसरली आहे.