शरद पवारांना सैतान म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचा खुलासा; म्हणाले, गावगाड्यामध्ये सैतान…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. त्यांनी पवारांबाबत सैतान असा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टिका होऊ लागल्याने अखेर सदाभाऊ खोत यांनी आज साताऱ्यात आपली प्रतिक्रिया दिली. माझ्याकडून अनावधानाने सैतान हा शब्द गेला आहे. गावगाड्यामध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील प्रस्थापितांना कडवट लागली. सेनापती गावगाड्याकडे येत आहे, त्याला रोखूया, असे मला म्हणायचे होते. सरदारांची जमावाजमव होता कामा नये, ही त्यामागची माझी भूमिका होती, असे खोत यांनी म्हंटले.

सदाभाऊ खोत यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी देखील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावेळी लोक देवेंद्रवासी झाल्याचा शब्दप्रयोग केला होता, पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा. त्यांच्याकडून तो अनावधानाने झाला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का? कारण गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये फोडाफोडी कोणी केली? याचा इतिहास तपासावा लागेल, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार हे सैतान असून त्यांना त्यांची पापे फेडावीच लागणार आहेत. शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर नियतीने मोठा सुड उगवला. त्यामुळे त्यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आली होती आता मात्र पुतण्यापासून मला वाचवा अशी नवी हाक महाराष्ट्राला ऐकू येत आहे. पूर्वीच्या काळी बापाने पाप केलं कि ते पोराला फेडावं लागत होत, पण या कलयुगात ज्याचे त्यालाच पाप फेडावं लागतंय अस म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता